पुणे –केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या रविवारी (दि. 19 डिसेंबर) पुणे दौऱ्यावर असून ते पुणे महापालिकेत येणार आहेत. त्यांच्या हस्ते महापालिका भवनाच्या हिरवळीवरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारकाचे भूमिपूजन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.
मात्र त्यांचा हा दौरा त्याआधीच वादाचा विषय ठरत आहे. पुण्याच्या भाजपाशासित स्थानिक प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. शाहांच्या स्वागतासाठी लावलेल्या फलकांवर केवळ भाजपा नेत्यांचे मोठे फोटो लावल्यावरुनही विरोधकांनी टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तसंच नगरसेवकांनी मात्र शुक्रवारी आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला. या पोस्टर्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो नाहीत, त्यामुळे त्यांचा अवमान झाल्याचा आरोप भाजपावर करण्यात आला आहे.
दरम्यान, महापौर मोहोळ यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांचे सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारक साकारण्यात येत आहे. तर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात येत आहे. हे दोन्ही कार्यक्रम गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते येत्या रविवारी दुपारी 3 वाजता होणार असून या दोन्ही कार्यक्रमांस केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थित असणार आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांनी आपणा सर्वांनाच दिशा दिलेली आहे. दैनंदिन जीवनात काम करत असताना या दोन्ही महापुरुषांच्या वाटेवरून वाटचाल करणे, हे प्रेरणादायी आहे. या दोन्ही महापुरुषांचे पुतळे महापालिकेच्या आवारात असावेत, ही मनोमन इच्छा होती. जी आता पूर्णत्वास जात असताना मनस्वी समाधान आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर