रांची: भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या झारखंड मधील आजच्या सभा रद्द करण्यात आल्या आहेत. ओडिशाच्या किनाऱ्यावर चक्रीवादळ थडकल्यामुळे तेथे मोठे नुकसान झाले आहे त्या पार्श्वभूमीवर आज हा निर्णय घेण्यात आला. मात्र अमित शहा यांच्या ऐवजी राज्याचे मुख्यमंत्री रघुवीर दास, बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे, माजी उपमुख्यमंत्री सुदेश महातो यांच्या उपस्थितीत या नियोजित सभा पार पडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अमित शहा यांच्या आज झारखंड मधील कोडेरमा, खुंती, आणि रांची येथे सभा होणार होत्या. या तिन्ही सभा रद्द करण्यात आल्या आहेत. या टप्प्यात 6 मे रोजी मतदान होणार असून त्याचा प्रचार उद्या सायंकाळी संपणार आहे. फनी चक्रीवादळामुळे झारखंड राज्याच्या सीमावर्ती भागातील दुमका. पुर्व आणि पश्चिम सिंघभूम या जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.