कॅम्प, फरासखाना परिसरात वाहनांना पर्यायी रस्ते

पुणे – सुरू असणाऱ्या वर्षाची सांगता आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील नागरिक विविध रस्त्यांवर आनंदोत्सवात सहभागी होतात. यावेळी वाहनांचीदेखील अधिक रहदारी असते. या काळात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली.

अग्निशमन दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्‍यक सेवेतील वाहने वगळता पुणे शहरातील कॅम्प, फरासखाना या परिसरातील वाहनांचे “डायव्हर्शन’ करण्यात येणार आहे.

नववर्षानिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे दि. 1 जानेवारीला सकाळी 7 वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत शिवाजी रस्त्यावरील चारचाकी वाहने आणि सर्वप्रकारच्या बसेस वाहतुकीस बंद राहणार आहे. स. गो. बर्वे चौक ते स्वारगेट या मार्गावरील वाहतूक स. गो. बर्वे चौक-खंडोजी बाबा चौक-टिळक चौकातून टिळक रोडमार्गे वळविण्यात येणार आहे. तर पुणे महापालिकेकडे जाणारी वाहतूक जंगली महाराज रस्ता-झाशी राणी चौक येथून वळविण्यात येणार आहे.

शहरातील सिग्नल पहाटेपर्यंत राहणार सुरू
पुणे विद्यापीठ चौक, नळस्टॉप चौक, टिळक चौक, सिंहगड रोड जंक्‍शन, मार्केटयार्ड चौक, खंडोजी बाबा चौक, ज्ञानेश्‍वर पादुका चौक, सिमला ऑफिस चौक, जेधे चौक, गुडलक चौक, फातिमानगर चौक, जहांगीर चौक, सेव्हन लव्ह चौक, केशवनगर, मुंढवा, कोरेगाव पार्क आदी प्रमुख चौकांसह शहरांतील सुमारे 20 हून अधिक सिग्नल दि. 31 डिसेंबरपासून दि. 1 जानेवारी रोजी पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत.

कॅम्प परिसरातील वाहतूक बदल याप्रमाणे असतील
वाय जंक्‍शनमार्गे एम.जी. रोडकडे येणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौक येथून कुरेशी मशीदमार्गे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

व्होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, ईस्ट स्ट्रीटमार्गे इंदिरा गांधी चौकाकडे वाहतूक वळविण्यात येणार आहे.

इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक लष्कर पोलीस स्टेशनकडे वळविण्यात येणार आहे.
सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक ताबूत स्ट्रीटमार्गे वळविण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.