नगर -लॉकडाऊन पासून नाभिक व परीट समाजाचा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. इतर उद्योग सुरू झाले आहे. मात्र, सलून व ग्रामीण भागातील परीट समाजाचा व्यवसाय अजूनही बंद आहे. तो सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव ऍड. सुभाष लांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
देशात असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा कायदा केला मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यासाठी कुठलीही आर्थिक तरतूद नाही. तसेच बाराबलुतेदारांमधील नाभिक समाजावर आलेल्या संकट काळात सर्वानी मदतीचा हात द्यावा. सर्वाची केशभूषा करून त्यांचे व्यक्तिमत्व घडविणारे कारागीर मात्र, अडचणीत आहेत. त्यांना खरी मदतीची गरज आहे. नियम व सुरक्षितता पाळून नाभिक व परिट समाजाला ही व्यवसायाला परवानगी द्यावी. बंद च्या काळातील 7 हजार 500 रूपये प्रतिमहा प्रमाणे जिवन भत्ता देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.