प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 4 -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुणे दौऱ्यावेळी चर्चा रंगली, ती विभागीय आयुक्त बदलाची. विभागीय आयुक्त आपल्या “फेव्हर’मध्ये नाहीत, असे सांगत कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या बदलीसाठी गळ घातली. “सीएम’ साहेब आता कार्यकर्त्यांचा हा हट्ट पुरविणार का, तसे झाल्यास नवे विभागीय आयुक्त कोण असतील, याची उत्सुकता आता ताणली गेली आहे.
महाविकास आघाडी सरकार खालसा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली नवे सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे साहजिकच प्रशासनातही बदलीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. मर्जीतील अधिकाऱ्यांची वर्णी लावणे आणि त्यांच्याकडून कामे करून घेणे, हे सर्वच पक्षप्रमुख करत असतात. तीच नीती पुण्याच्या विभागीय आयुक्तपदासाठी राबविली जाणार आहे. त्यामुळे आता विभागीय आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पुण्यातील विभागीय आयुक्तांविषयी काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. हे विभागीय आयुक्त आपल्या “फेव्हर’मधील नाहीत, अशी तक्रार यावेळी करण्यात आली.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झाला नाही. त्यातून पालकमंत्री पदही दिले गेले नाही, त्यामुळे जिल्ह्याचे अनेक निर्णय रखडले आहेत. पुण्यामध्ये “पालकमंत्री देता का पालकमंत्री?’ अशा घोषणा देत विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलनही केले आहे. मात्र, त्यावर निर्णय झाला नाही. अशातच आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहू लागल्याने, अधिकाऱ्यांनी हवी ती पोस्टिंग मिळविण्यासाठी सरकार दरबारी “फिल्डिंग’लावली आहे. या “फिल्डिंग’मधूनच आता पुणे विभागाच्या विभागीय आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते, ते लवकरच समजणार आहे.
…”ती’ तीन नावे गुलदस्तात
तुम्हाला तीन नावे देतो, त्यातील एक नाव तुम्ही सांगा, त्या नावाची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे करतो, असे आश्वासन एका आमदाराने कार्यकर्त्यांना दिले.