नवी दिल्ली – भाजप नेते बग्गा यांच्या अटकेवरून राजकारण तापले आहे. त्यातून भाजप आणि आपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्या.
बग्गा यांना अवैधरित्या अटक करण्यात आली. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा खोटारडेपणा चव्हाट्यावर आणत असल्याने त्यांना लक्ष्य केले जात आहे. बग्गा यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली.
एखाद्या व्यक्तीला अटक करायची असल्यास परराज्यांतील पोलिसांनी स्थानिक पोलिसांना त्याविषयीची माहिती द्यायची असते. मात्र, पंजाब पोलिसांनी बग्गा यांच्या अटकेविषयी दिल्ली पोलिसांना कळवले नव्हते, अशा आरोपांची सरबत्ती भाजपकडून करण्यात आली.
भाजपच्या आरोपांचा समाचार आपचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी घेतला. पंजाबमध्ये हिंसाचार घडवण्यासाठी चिथावणी दिल्याबद्दल बग्गा यांना अटक करण्यात आली. ती कारवाई सूडबुद्धीतून करण्यात आली नाही. पंजाब पोलीस नि:पक्षपातीपणे काम करत आहेत. उलट, भाजपकडून स्वत:च्या राजकीय लाभासाठी विविध यंत्रणांचा गैरवापर केला जातो, असा पलटवार भारद्वाज यांनी केला.