आळंदी – कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षा निमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्यावतीने श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत नियोजित माऊली बागेत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शांतिब्रह्म मारुती महाराज कुऱ्हेकर व डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले.
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात माऊलींच्या मूर्ती पूजनाने झाली. तसेच कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, कलश पूजन उद्योजक मयूर मोहिते, ग्रंथपूजन परमेश्वर महाराज जायभाये, वीणा पूजन नरहरी महाराज चौधरी यांच्या हस्ते पार पडले. यानिमित्ताने या कार्यक्रमास श्रीराम जन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरीजी महाराज यांनी आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. व स्व. प्रा. गोपाळराव माळवदे (बेळगाव) यांनी कानडी भाषेतील अनुवादीत ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील ग्रंथालयास भेट दिल्याबद्दल माळवदे कुटुंबीयांचा स्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, खजिनदार डॉ. दीपक पाटील, श्रीधर सरनाईक, वेदमूर्ती निखील प्रसादे, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सिद्धनाथ चव्हाण, प्रभारी उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अशोक बनकर, शिक्षक प्रतिनिधी अल्लाबक्ष मुलाणी, शिक्षकेतर प्रतिनिधी पूजा भोसले, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
रोज सकाळी सात ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी चार ते पाच प्रवचन, सायं पाच ते सहा हरिपाठ, सायं सहा ते आठ कीर्तन, रात्री नऊ ते अकरा संगीत भजन या प्रकारे साप्ताहिक कार्यक्रम सुरू आहे. एकनाथ महाराज कोष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण पार पडणार आहे.
पंतप्रधानांना मूर्ती देण्याचा मानस
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेने सन्मानात दिलेली माऊलींची मूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी (दि. 3) प्रसाद म्हणून देण्यात येणार असल्याचे गोविंद देवगिरीजी महाराज यांनी सांगितले.