पणजी – पोरीम मतदारसंघातून भाजपने प्रतापसिंह राणे यांची सून दिव्या राणे यांना उमेदवारी दिली आहे. सुनेच्या नावाची घोषणा होताच प्रतापसिंह राणे यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, 87 वर्षीय प्रतापसिंह राणे हे पोरीममधून 11वेळा आमदार म्हणून निवडून आले असून एकही निवडणूक हरलेले नाहीत. यामुळे कॉंग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
पोरीमच्या जागेवर प्रतापसिंह राणे यांचा विजय निश्चित मानला जात असताना भाजपने मोठी खेळी करत कॉंग्रेसला धक्का दिला आहे. दिव्या राणे यांचे पती आणि प्रतापसिंह यांचा मुलगा विश्वजित राणे हे भाजप सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. विश्वजित राणे हे वाळपोईतून निवडणूक लढवत आहेत. यावेळी भाजपने विश्वजित राणे यांच्या पत्नीलाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दिव्या राणे या पहिलीच निवडणूक लढवत आहेत.
सून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर प्रतापसिंह राणे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, वाढत्या वयामुळे, कुटुंबाचा कोणताही दबाव नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे प्रतापसिंह राणे यांनी म्हटले आहे. राणे या मतदारसंघातून 11 वेळा आमदार झाले असून ते कधीही पराभूत झाले नाहीत. त्यामुळेच आपल्या ज्येष्ठ नेत्याने अशा प्रकारे हात वर केल्याने कॉंग्रेस नाराज आहे.