सणउत्सव- साडेतीन मुहुर्तातील एक : अक्षय्यतृतीया

विलास पंढरी

“अक्षय’ म्हणजे जे “क्षय’ पावत नाही ते आणि हा सण ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध तृतीयेला येतो म्हणून याला म्हणतात “अक्षय्यतृतीया’. कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, “या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून अक्षय्यतृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते’. या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे. हिंदू धर्म हा जगातील अतिप्राचीन धर्म असून अगणित देवदेवता व त्या अनुषंगाने येणारी व्रतवैकल्ये आणि सण हे त्याचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक सणामागे काहीतरी शास्त्रीय आणि सामाजिक कारणे असूनही धार्मिक अवडंबरामुळे आणि जातिभेदामुळे मानव बदनाम झाला आहे.

हिंदू दिनदर्शिकानुसार, गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन्‌ कार्तिक शुद्ध प्रतिपदा (दिवाळी पाडवा) म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहुर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पाहावा लागतो तसा या दिवशी मात्र मुहूर्त पाहावा लागत नाही. जैनधर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला खानदेशात आखा तीज (आखाजी) असेही म्हटले जाते. आखाजी अर्थात खानदेशातील अक्षय्यतृतीया- सासुरवाशिणींचा सण म्हणून साजरा केला जातो.

खानदेशात या दिवशी घरोघरी अक्षय्य घट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटे मातीचे भांडे ठेवून वरती खरबूज आणि दोन सांजोऱ्या आणि दोन आंबे ठेवतात. छोटे भांडे पितरांसाठी म्हणजे पूर्वजांसाठी असते. या दिवशी आपले पूर्वज पाणी पिण्यासाठी येतात अशी श्रद्धा आहे. आधी त्यांना पाण्याचा घट देऊन मग नवीन माठ वापरण्यात येतो. पितरांचे श्राद्ध वा तर्पणविधी होतो. सकाळी उंबरठ्याचे औक्षण करून पूर्वजांचे स्मरण करून कुंकवाचे एकेक बोट उंबऱ्यावर उमटवत आणि एकेक नाव उच्चारत पितरांना आमंत्रण दिले जाते. दुपारी चुलीवर, आता गॅसवरच “घास’ टाकतात. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा जबरदस्त बेत असतो. आजपासूनच आंबे खायला सुरुवात करतात.

रस्त्यावरल्या पाणपोयांचे उद्‌घाटन केले जाते. खानदेशात आखाजीचे अजून एक महत्त्व आहे. भले तो लौकिक अर्थाने पितरांचा सण का म्हणेनात, पण खानदेशात हा सासुरवाशिणींचाही सण आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातून पूर्वी दोनदाच माहेरी जायला मिळायचे. दिवाळी आणि आखाजीला. दिवाळी घाईगडबडीत देणेघेणे करण्यात जात असे. आखाजी म्हणजे विसाव्याचा सण. सासर व कामाच्या रट्ट्यातून तेवढाच आराम. त्यामुळे त्या या सणाची आतुरतेने वाट बघत. सासुरवाशिणींना गौराई असे म्हटले जाते आणि जावयाला शंकरजी! माहेरी या सासुरवाशिणीचे खूप कोडकौतुक असायचे. आमरस, पुरणपोळीचे गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आणि असेच गोडधोड. दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात.

आंब्याच्या झाडाखाली पथाऱ्या टाकल्या जातात. गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरू होते. मग आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात. अहिराणी भाषेत गाणी म्हटली जातात. अर्थात हल्ली यातले बरेच कमी होत चाललेय. उर्वरित महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात या सणाला आकिती किंवा आखिती असे म्हणतात. या दिवशी पित्रे पाणी प्यायला येतात म्हणून टेरेसवर पाणी भरून छोटासा माठ (मातीचे भांडे) ठेवतात.काही लोक आमरस पोळीचा नैवेद्यही ठेवतात.पूर्वी अक्षय्यतृतीयेपूर्वी आंबे खात नसत. आता प्रीझर्वेटिव्हच्या जमान्यात वर्षभर कधीही आमरस खाता येतो.

ह्या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्‍वर जयंती आणि हयग्रीव जयंती येते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने मदत केली अशी आख्यायिका प्रचलित आहे.

* या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्यतृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.
* नर-नारायण या जोडीने या दिवशी अवतार घेतला होता.
* परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते, असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते.
* वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्‍त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.
* जो मनुष्य या दिवशी गंगास्नान करेल, तो पापातून मुक्‍त होतो अशी श्रद्धा आहे.

बुंदेलखंडमधे अक्षय्यतृतीयेपासून प्रारंभ होऊन पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. त्यात अविवाहित मुली भाऊ, पिता तसेच घरातील व गावातील पुरुषांना शुभेच्छा देतात व गीतगायन करतात. अक्षय्यतृतीयेला राजस्थानमध्ये मुहुर्तावर पर्जन्यदेवतेची पूजा करून भरपूर पावसाची अपेक्षा व्यक्‍त केली जाते. मुली एकत्र येऊन घरोघरी जाऊन पर्जन्यदेवतेची गाणी म्हणतात आणि मुले पतंग उडवतात. या दिवशी सात प्रकारच्या अन्नपदार्थांनी नैवेद्य दाखवला जातो. माळवा प्रांतात नवीन भांड्यावर टरबूज आणि आंब्याचे डहाळे देऊन पूजा केली जाते. अक्षय्यतृतीयेला शेतीच्या कामाला सुरुवात केली की शेतकऱ्यांना समृद्धी येते अशी येथे श्रद्धा आहे.

जैन धर्मीयांमधेही अक्षय्यतृतीयेला तृतीय विशेष महत्त्व आहे. याच दिवशी जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांनी एका वर्षाची तपस्या पूर्ण झाल्यानंतर प्रथम आहार घेतला होता. या दिवशी राजा श्रेयांसने मुनिराज ऋषभदेवांना भक्‍तिपूर्वक उसाच्या रूपात आहारदान देऊन अक्षय पुण्य प्राप्त केले होते. जैनधर्मीयांची अशी श्रद्धा आहे की उसाच्या रसाला इक्षुरस म्हणत असल्याने या घटनेमुळेच या दिवसाला अक्षय्यतृतीया असे म्हटले जाऊ लागले.
पुण्याईचा साठा वाढण्यासाठी अक्षय्यतृतीयेचे पूजन सांगितले आहे. शक्‍यतो कुलदेवतेची पूजा करावी.

कुलदैवत माहिती नसल्यास कुठल्याही देवाची पूजा करून कुलदैवतौ नम: असे म्हणावे. या दिवशी जलदानाचे महत्त्व सांगितले आहे. जलदान, वृक्षसंवर्धन आणि मुक्‍या प्राणांना जीवनदान दिल्यास अनेक दोष नष्ट होतात. अक्षय्यतृतीयेला केलेली पूजा ही घराण्यातील अनेक दोष नष्ट करून कुटुंबाचा उद्धार करते. शक्‍य असेल तर या दिवशी पाणपोया सुरू कराव्यात. पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाचवा हा मानवाच्या प्रगतीसाठी आवश्‍यक असलेला संदेश देणारा हा सण आहे. प्रत्येक सणामागील ही चांगली तत्त्वे विचारात घेऊन सण साजरे केल्यास प्रत्येक सण खऱ्या अर्थाने समाजोपयोगी ठरतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.