अभिनेता अक्षय कुमार अभिनित लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच अनेक चित्रपट हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असल्याचं वृत्त आलं होतं. त्यात अक्षयचा लक्ष्मी बॉम्बही असणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार याने साडी या पोशाखाचा अनुभव सांगितला आहे.
या चित्रपटात अक्षय एका तृतीयपंथीयाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे त्याने साडी, बांगड्या, टिकली असा महिलांचा पोशाख केला आहे. या अनुभवाविषयी सांगताना अक्षय एका मुलाखतीत म्हणाला की, माझ्यासाठी ती एक खूप सुंदर गोष्ट होती. साडी हा जगातल्या सर्वात सुंदर पोशाखांपैकी एक आहे. साडी कोणत्याही प्रकारच्या शरीरयष्टीवर शोभून दिसते, असं अक्षय म्हणाला.
चित्रीकरणादरम्यान साडीतून वावरत असतानाच्या अनुभवावर अक्षय म्हणाला की, मी सेटवर साडीत असायचो. पण, त्यात वावरणं कर्मकठीण काम आहे. चित्रीकरण सुरू व्हायच्या आधी मला साडी नेसावी लागायची. सुरुवातीला मला सवय नसल्याने मी धडपडायचो. साडीत नेमक चालू कसं, तेच कळायचं नाही, असा गमतीदार किस्सा त्याने सांगितला आहे.
अनेक महिला रोज साडी परिधान करून ऑफिसला जातात, ट्रेनने प्रवास करतात. पण, त्यांचा लूक तरीही तसाच असतो. मी महिलांना सलाम करतो. ज्या प्रकारे त्या साड्या सांभाळून रोजचे व्यवहार करतात, ते खरंच कमाल आहे. एखाद्याला ही कृती सोपी वाटत असेल, त्याने आयुष्यात एकदातरी साडी नक्की नेसून पाहावी, असा सल्लाही अक्षयने दिला आहे.