हॉंगकॉंग : हॉंगकॉंगवर चीनी राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याच्या प्रयत्नांचा निषेध म्हणून शेकडो निदर्शक रस्त्यावर उतरले. याचेळी चीनी शासकांनी 30 जणांना अटक केली.
ब्रिटिशांनी चीनला हॉंगकॉंगचा ताबा दिल्याच्या घटनेला 23 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त ही निदर्शने करण्यात आली. हॉंगकॉंगमध्ये एक जुलैला पूर्ण दिवसभर निदर्शने करण्यात आली. त्यात अटक केलेल्यांवर दहशतवाद, परकीय शक्तींशी हातमिळवणी आणि फुट पाडण्याचा प्रयत्न तसेच देशद्रोहाची कलम लावण्यात आली आहेत. याबाबतचे वृत्त चायना मॉर्निंग पोस्ट या दैनिकाने दिले आहे.
नव्याने लागू केलेल्या कायद्याचे उल्लंघन करत आहात हा इशारा देण्यासाठी पोलिसांनी निदर्शकांसमोर संचलन केले. मात्र, मानवी हक्कांच्या होणाऱ्या पायमल्लीविरोधात आंदोलक आपल्या पवित्र्यावर ठाम आहेत.
पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी क्रुरपणे मिरची पावडरचा मारा केला. किमान दोन आंदोलकांना यामुळे उपचार घ्याव लागले. वान चुईमध्ये निदर्शकांनी प्रशासकीय कार्यालयाच्या दिशेने कूच केले. स्वतंत्र हॉंगकॉंग हीच आजची क्रांती आणि एकच मार्ग हॉंगकॉंगचे स्वातंत्र्य अशा घोषणा निदर्शक देत होते.
पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही न ऐकल्याने 30 जणांना अटक करण्यात आली आहे. सरकारी कामात व्यत्यय, नव्या कायद्याचे उल्लंघन असे गुन्हे त्यांच्यावर नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी फेसबूक पेजवर ही माहिती दिली आहे.