अजित पवारांचे  वर्चस्व संपुष्टात?

शहरातील रेकॉर्डब्रेक पराभवाची हॅट्ट्रिक
संघटनेवरील पकड ढिली झाल्याचे संकेत

पिंपरी – विधानसभा, महापालिका आणि त्यापाठोपाठ आता पार्थ पवार यांचा झालेला पराभव हा राष्ट्रवादीसाठी धोक्‍याची घंटा देणारा ठरला आहे. पराभवामुळे गेल्या वीस वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरावर अजित पवारांचे असलेले वर्चस्व संपुष्टात आले आहे. तर स्वत:च्या पुत्रालाही पवार विजयापर्यंत घेऊन जाऊ न शकल्यामुळे पक्षावरील पकडही ढिली झाल्याची चर्चा रंगली आहे.

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी हट्ट करत पार्थ यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. कसल्याची परिस्थितीत विजय मिळवायचाच या इर्ष्येने उतरलेल्या पवारांना निकालामुळे मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आजपर्यंत पिंपरी-चिंचवड शहराची संपूर्ण सूत्रे अजित पवार यांच्या हाती होती.

अजित पवार म्हणतील तोच अंतिम शब्द अशी स्थिती तब्बल 18 वर्षे या शहरातील राजकारण्यांनी अनुभवली. मात्र मोदी लाटेत राज्यातील सत्ता गेल्यानंतर 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीतही अति आत्मविश्‍वासाचा फटका बसला आणि महापालिकेच्या सत्तेतून राष्ट्रवादीला पायउतार व्हावे लागले. या पराभवातून राष्ट्रवादीने आणि त्यांच्या नेत्यांनी काही बोध घेतला की नाही हे निकालावरून पुन्हा एकदा अनुभवास आले. महापालिकेतील धक्कादायक पराभवापेक्षाही मावळमध्ये अजित पवार यांच्या पुत्राचा पराभव अत्यंत आश्‍चर्यकारक असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

या पराभवाला पुन्हा एकदा अति आत्मविश्‍वास आणि निष्ठावंतांपेक्षाही आयारामांवर ठेवलेला विश्‍वास, त्यांच्या हाती दिलेली सूत्रे, त्यातच स्वकीयांपेक्षाही इतरांकडून रसद मिळेल या आशेवर निवडणुकीची आखलेली धोरणेच कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. तब्बल दोन लाखांहून अधिक मतांनी पार्थ यांचा झालेला पराभव राष्ट्रवादीसाठी आणि विशेषत: अजित पवारांसाठी आत्मचिंतन करणारा ठरला आहे. एकही सत्ताकेंद्र सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात नसून पूर्वीच पक्षाला लागलेली गळती येत्या काळात पुन्हा नव्याने सुरू होण्याची शक्‍यता आहे. ही गळती रोखण्याबरोबरच विधानसभेसाठी पक्षाला नव्या जोमाने तयार करण्याची जबाबदारीही अजित पवारांच्याच खांद्यावर असल्याने ते आता काय दिशा देतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.