पुणे – राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेल्या आरोपांसंदर्भात पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये न बोलावता त्यांच्या घरी जाऊन बीकेसी पोलीस तपास करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, आता या सर्व प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “नोटीशी देण्याची पद्धत राज्यात नव्हती. पण जबाबदार व्यक्तीनेही बोलताना भान बाळगलं पाहिजे.’ असं अजित पवार म्हणाले. आज (दि. १३) सकाळ पासून पासूनच अजित पवार पुण्यात ३१ ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्याचे काम सुरू केले आहे.
आणि याच भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर त्यांना प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस आली आहे. त्याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं होतं, त्यावर त्यांनी हा सल्ला दिला. तसेच जनतेला राजकारण्यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजिबात रस नाही. त्यांना त्यांच्या भागाचा विकास हवा आहे, असंही अजित पवार म्हणाले.