मुंबई – “अभिनेत्री ऐश्वर्या राय ही मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे आणि त्वचा सुंदर आहे. तुम्हीही मासे खाऊन डोळे सुंदर करा. म्हणजे जिला पटवायचे तिला पटवता येईल,” असं वादग्रस्त आणि धक्कादायक विधान विजय कुमार गावित यांनी केले होते. या विधानानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता गावित यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.
विजय कुमार गावित म्हणाले की, “ऐश्वर्या राय माझ्या मुलीसारखी आहे, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मासे खाण्याचे, म्हणजेच फिश ऑईलचे आरोग्यासाठीचे फायदे मी आदिवासी लोकांना समजावून सांगत होतो. आरोग्यासाठी मासे चांगले आहेत, हेच सांगण्यामागचा उद्देश होता.”
धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छीमार बांधवांना मासेमारीचे साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गावित यांनी हे विधान केलं. त्यावेळी मंचावर डॉ. सुप्रिया गावितही उपस्थित होत्या. दररोज मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रॉयचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही दररोज मासे खाल्ले की तुमचेही डोळे सुंदर होतील. जिला पटवायचे तिला पटवूनच घ्याल, असे वादग्रस्त विधान विजयकुमार गावित यांनी केले होते.
तर दुसरीकडे, राज्याच्या महिला आयोगाने विजय कुमार यांच्या वक्तव्याची दखल घेऊन त्यांना नोटीस पाठवली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या की, “राज्य महिला आयोगाला काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महिला आयोगाने त्या तक्रारींची दखल घेतं, त्यांना नोटीस पाठवली आहे. विजयकुमार गावित यांनी सार्वजनिक कार्यक्रमात काही गोष्टी सांगत असताना, ज्या पद्धतीने उल्लेख केला ते निश्चितच महिलांचा अपमान करणारे विधान आहे.” या नोटीशीला उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे तीन दिवसांचा कालावधी असल्याचे देखील चाकणकर यांनी सांगितले.
नेमकं काय म्हणाले होते विजयकुमार गावित?
”तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना? त्यांनी काही सांगितलं की नाही ऐश्वर्या रॉयबद्दल? ती समुद्राच्या किनारी राहणारी. बेंगलोरची समुद्राच्या किनारी राहणारी. ती दररोज मासे खायची. बघितले ना तिचे डोळे? तसे तुमचेही डोळे होणार. हाही एक फायदा आहे. मासे खाल्ले ना तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात. माशात एकप्रकारचं तेल असतं. त्या तेलामुळे त्वचाही चांगली दिसते,” असे मासे खाण्याचे फायदे गावित यांनी सांगितले होते.