पुणे – पुणे-मुंबई महार्मागालगत वाढती रहदारी आणि पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता या परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास होण्याची गरज निर्माण झाली होती. हीचबाब लक्षात घेऊन “सफर’ या हवेच्या गुणवत्ताविषयक अभ्यास करणाऱ्या संस्थेतर्फे मुंबई-पुणे महामार्गावर हवेच्या गुणवत्तेची पाहणी करणाऱ्या यंत्रणेची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे पुणेकरांना आता मुंबई-पुणे महामार्गावरील हवेच्या गुणवत्तेची सद्यस्थिती कळणार आहे.
शहर आणि परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपोकल मेटरोलॉजी (आयआयटीएम) या केंद्रीय संस्थेची सहयोगी संस्था असलेल्या “सफर’ या संस्थेतर्फे शहरात विविध ठिकाणी ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. आतापर्यंत ही संख्या 11 केंद्रे इतकी होती. यामध्ये आता आणखी एका केंद्राची भर पडली असून शहरात आता एकूण 12 केंद्रे कार्यान्वित आहेत.
शिवाजीनगर, पाषाण, लोहगाव, आळंदी, कात्रज, हडपसर, भोसरी, निगडी, मांजरी, कोथरूड आणि पिंपरी-चिंचवड याठिकाणी ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. या पाहणी केंद्रांकडून हवेतील विविध घटकांच्या प्रमाणाबाबत माहिती गोळा केली जाते. याच माहितीच्या आधारे हवेतील गुणवत्ता चांगली आहे की वाईट, आणि त्याचे प्रमाण किती याबाबत निष्कर्ष काढला जातो.
एका केंद्रातर्फे सुमारे 50 किलो मीटरपर्यंतच्या परिसरातील हवेची सदस्थिती अभ्यासता येते, अशी माहिती आयटीएम-सफरचे माजी उपसंचालक डॉ. दिलीप चाटे यांनी दिली.