बहुमजली कार पार्किंग इमारत उभारण्यासाठी हवाई दलाची मंजुरी
पुणे – विमानतळ परिसरात बहुमजली कार पार्किंग इमारत उभारण्यासाठी हवाई दलाकडून मंजुरी मिळाली असून नोव्हेंबरमध्ये या इमारतीचे काम सुरू होणार असल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना लवकरच प्रशस्त पार्किंग सुविधा उपलब्ध होणार आहे.
हवाई दलाच्या अधिपत्याखाली असलेल्या पुणे विमानतळ परिसरात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यासाठी हवाई दलाकडून परवानगी घेणे बंधनकारक असते. त्यानुसार विमानतळ प्राधिकरणाकडून बहुमजली कार पार्किंगच्या उभारणीसाठी जानेवारीमध्ये हवाई दलाकडे परवानगी मागितली होती. नुकतीच हवाई दलाकडून इमारतीच्या उभारणीसाठी “ना हरकत’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. “ग्रीन सिग्नल’ मिळाल्याने लवकरच प्राधिकरणाकडून नवीन पार्किंग इमारत उभारली जाणार असून नोव्हेंबरमध्ये हे काम सुरू होणार असल्याचे विमातळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
याबाबत माहिती अधिकारी अजयकुमार म्हणाले, “सध्या विमानतळावर क्रमांक एक आणि दोन याप्रमाणे दोन जागा उपलब्ध आहेत. यापैकी क्रमांक एकची पार्किंग ही ओला, उबेर आणि अन्य खासगी वाहनांना “पिक पॉइंट’ म्हणून उपलब्ध करण्यात आली आहे. तर दुसऱ्या क्रमांकाच्या पार्किंगमध्ये विमातळ कर्मचारी, सुरक्षा अधिकारी आणि दुचाकी, चारचाकी प्रवासी वाहनांची पार्किंग केली जाते. मात्र, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ही जागा अपुरी पडत होती. त्यामुळेच बहुमजली कार पार्किंग उभारण्याचा निर्णय प्राधिकरणाकडून घेण्यात आला होता.
हवाई दलाकडून परवानगी मिळाल्याने लवकरच याचे काम सुरू होईल. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च सुमारे 120 कोटी असून खासगी बांधकाम कंपनीकडून हे काम केले जाणार आहे. तसेच, प्राधिकरणाकडूनही काही निधी दिला जाणार आहे.’