नगर – महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे व सफाई कामगारांच्या वारसा हक्कांच्या नियुक्तीबाबत मुंबई मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणारी बैठक अचानक रद्द करण्यात आली. त्यामुळे महापालिका कर्मचारी नाराज झाले आहेत. दरम्यान, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवांशीही चर्चा केली. सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचला असून लवकरच यावर निर्णय होईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली.
कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंगळवारी बैठक होणार होती.मात्र, ती रद्द झाली. संघटनेचे पदाधिकारी सोमवारीच मुंबईत पोहोचले होते. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचला आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. लवकरच सातवा वेतन आयोग मंजूर होईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. तसेच लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्तीबाबतचा विषय संपूर्ण राज्याचा आहे.
याबाबत मुख्यमंत्री स्वतः बैठक घेणार आहेत. या दोन्ही विषयांवर आजची रद्द झालेली बैठक लवकरच होईल, असेही त्यांनी सांगितल्याचे लोखंडे यांनी स्पष्ट केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात सचिव भूषण गगरणी यांचीही भेट घेतली. त्यांनी प्रस्तावाची पडताळणी केली असून, त्यात कोणतीही त्रुटी राहिली नसल्याने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत सूचना दिलेली असल्याने लवकरच प्रस्ताव मंजूर होऊन आदेश दिले जातील, असे आश्वासन दिल्याचे लोखंडे यांनी सांगितले. आमदार संग्राम जगताप यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संघटनेचे पदाधिकारी व मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले.