पाथर्डी: तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील दोन गटांत हाणामारी होऊन सात जण जखमी झाले आहेत. अध्यक्ष संजय मरकड, विश्वस्त शिवजीत डोके व अन्य पाच जण जखमी झाले आहेत.या जखमींना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयत दाखल करण्यात आले. अध्यक्ष संजय मरकड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना नगर येथे हलविण्यात आले.
अनेक दिवसांपासून कानिफनाथ देवस्थानच्या ट्रस्टमधील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव निवडीबाबत धुसफूस चालू होती. सकाळी देवस्थान समितीच्या सभागृहामध्ये सर्व विश्वस्त मंडळाची अध्यक्षपदाच्या निवडीबाबत बैठक बोलवण्यात आली होती. त्या बैठकीवरून निवडीचा वाद उफाळून आला, या दरम्यान जोरदार हाणामारी झाली. विश्वस्त मंडळामध्ये दोन गट पडले असून अनेक दिवसांपासूनचा हा वाद गुरुवारी सकाळी हाणामारी झाला. या हाणामारीमुळे भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
देवस्थान समितीचे अध्यक्ष व सरपंच संजय बाजीराव मरकड, संकेत संजय मरकड, प्रतीक दत्तात्रेय काळदाते, सुनील ज्ञानदेव निमसे, अक्षय राजेंद्र कुटे, विश्वस्त शिवजीत बलभीम डोके, प्रसाद बलभीम डोके अशा जखमींची नावे आहेत. भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी संजय मरकड यांची विचारपूस केली. दरम्यान, या प्रकरणी विश्वस्त शिवजीत बलभीम डोके यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात अध्यक्ष व सरपंच संजय मरकड, संकेत मरकड, प्रतीक काळदाते
अक्षय कुटे, बाळासाहेब मरकड, दत्ता मरकड (रा. मढी) व इतर दहा ते पंधरा जणांनी प्लास्टिक पाईप व लाकडी काठ्याने मारहाण करून शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. माजी अध्यक्ष संजय मरकड यांनी मीटिंग हॉलला कुलूप लावल्याने डोके व त्यांचे सहकारी बाहेर मिटींग घेत होते. त्यावेळीं मढी देवस्थानची चालू असलेल्या बैठकीमध्ये मरकड हे येऊन म्हणाले , तुम्ही मीटिंग कसे काय घेता असे म्हणून मरकड यांनी प्रोसिडिंग बुक हातात घेतले, असे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले.