नगर -नगरमध्ये फुटबॉलला चालना देण्याबरोबरच गुणी खेळाडू हेरून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्स क्लब सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. आता नगरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल प्रशिक्षण मिळण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्स क्लबने अहमदनगर महाविद्यालयात फुटबॉल प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.
नगर महाविद्यालय येथे या प्रशिक्षण केंद्राचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. यावेळी शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल ट्रस्ट अध्यक्ष तथा जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस, उपप्राचार्य डॉ. नोएल पारगे, डॉ. प्रितम बेदरकर, समन्वयक डॉ. रजाक सय्यद, फिजिकल डायरेक्टर डॉ.सेवियो विगस, मनोज वाळवेकर आदी उपस्थित होते. फिरोदिया म्हणाले, नगर शहरासह जिल्ह्यात फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र नगर महाविद्यालयच्या मैदानावर सुरू केले जात आहे.