नगर – मला खासदार होऊन अवघी चार वर्षे झाली आहेत. उत्तर नगर जिल्ह्यात मी साखर वाटून दिवाळी गोड केली तर अनेकांची अडचण झाली. मात्र, मागील तीस वर्षात दिवाळी कोठे होती? 20-20 वर्षे नगरसेवक व आमदारांनी कधी दिवाळी केली का? त्यांच्या तीस वर्षाच्या हिशोब त्यांनी आधी द्यावा, असे आव्हान भाजपचे नगर दक्षिणेचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी गुरुवारी सायंकाळी येथे दिले. दरम्यान, फराळ वाटून माणूस मोठा झाला असता तर प्रत्येक हलवाई हा आमदार झाला असता, असा सूचक टोला त्यांनी लगावला.
नगर-कल्याण महामार्गावरील नेप्ती चौकातील सीना नदीवर 27 कोटी रुपये खर्चून नवा पूल उभारला जात आहे. त्याचे भूमिपूजन खा. विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. त्यानंतर खा. विखे यांनी ठाकरे सेनेचे युवा सेना पदाधिकारी विक्रम राठोड, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे व पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली.
जिल्ह्यात सुमारे दहा फराळाचे कार्यक्रम या काळात झाले. फराळाने जर माणूस मोठा झाला असता तर प्रत्येक आमदार हा हलवाईच झाला असता, असा उपरोधिक घणाघात त्यांनी केला. विकास या एकमेव मुद्द्यावर पक्षीय जोडे बाजूला ठेवून मी व आ. जगताप एकत्रित करत असलेले काम अनेकांना आवडत नाही, असा दावाही खा. विखे यांनी केला.
दक्षिणेत दुसरी दिवाळी
येत्या 22 जानेवारीला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्त एक डिसेंबर 2023 ते 20 जानेवारी 2024 यादरम्यान दक्षिण नगर जिल्ह्यातील प्रत्येक घरात दुसरी दिवाळी साजरी करणार आहोत.