राहाता – शिर्डी लोकसभा मतदारसंघात विकासकामे करणारा उमेदवार द्यावा, अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याची माहिती राहाता तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांनी दिली. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आले नाही. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे देवस्थान आहे.
संपूर्ण जगभरातून भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. शिर्डी व परिसराचा अधिक विकास व्हावा, यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघात विकास कामे करण्याचे व्हिजन असणारा उमेदवार द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनाबरोबर घेऊन करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांनी दिली.
२०२४ शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून शिर्डी व परिसराचा विकास करणारे सक्षम व अभ्यासू उमेदवार देऊन आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या माध्यमातून येथील पर्यटनाला चालना मिळेल.
परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होऊन शिर्डी परिसराच्या अर्थचक्राला गती मिळण्यास मोठी मदत होईल. शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी आपण प्रमुख्याने लक्ष घालून योग्य उमेदवाराला महायुतीकडून संधी द्यावी, त्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेतील, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन करणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.