संगमनेर – शहरातील सबजेलमधील चार आरोपींनी जेलचे गज तोडून पलायन केल्याची घटना पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले आहेत. कारागृहातून पळलेल्या कैद्यांचे फोटो पोलिसांनी माध्यमांना दिले असून कुणाला दिसल्यास संगमनेर शहर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारीच उपकारागृह आहे. या कारागृहामध्ये चार बराक असून एक बराक ही महिला कैद्यांसाठी आहे. या जेलमध्ये 24 कैद्यांची क्षमता असतानाही 55 ते 60 कैदी या जेलमध्ये ठेवलेले आहे. आज सकाळी साडे सहाच्या दरम्यान आरोपी रोशन थापा ददेल, अनिल ढोले, राहुल देविदास काळे आणि मच्छिंद्र जाधव अशी पसार झालेल्या आरोपींची नावे आहेत. तुरुंगाचे गज कापून आरोपींनी पळ काढल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
संगमनेरच्या कारागृह सध्या अनेक कैदी शिक्षा भोगत आहे. काल रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले राहुल काळे, मच्छिंद्र जाधव, रोशन थापा ददेल, अनिल काळे हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या आरोपींनी जेलमधून पळ काढला. बंदोबस्तावरील पोलिसांचे दुर्लक्ष व्हावे, यासाठी जेलमध्ये मोठ मोठ्याने गाणे आरत्या सुरू होत्या. या गोंधळात या चौघांनी जेलचे गज तोडले. ठरल्याप्रमाणे बाहेर एक कार अगोदरच येऊन थांबलेली होती. जेल तोडून हे कैदी या कारमध्ये बसून पसार झाले.
सकाळी साडेसहा ते पावणे सात च्या दरम्यान जेलमधून कैदी पळून जात गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे पोलीस ठाण्यात हजर झाले आणि घटनेचा तपास सुरू केला. त्यानंतर चार तासानंतर अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी हजेरी लावली. साधारण एक वाजता पोलीस अधीक्षक राकेश ओला संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हजर राहिले. रात्रीच्या वेळी कारागृहाच्या बंदोबस्तासाठी चौघांची नियुक्त करण्यात आले होती. पळून गेलेले आरोपी हे गंभीर गुन्ह्यातील असल्याने त्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे.
गज कापण्यासाठी ब्लेड कसे पोहोचले?
संगमनेरच्या कारागृहातुन चार आरोपी पूर्व नियोजन करून पळून जातात. विशेष म्हणजे आरोपींना घेण्यासाठी चारचाकी गाडी पोलीस ठाण्याच्या बाहेर वाट पाहत उभी होती. त्यामुळे जेलमध्ये गज कापण्यासाठी ब्लेड कसे पोहचले? त्यांनी बाहेर संपर्क कसा साधला? हे मात्र अनुत्तरित प्रश्न आहे. चौघांना जेलमध्ये बंदोबस्त असताना यात गर्भवती असलेल्या महिलेला बंदोबस्तासाठी कसे ठेवले, असे नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.
=====================