जामखेड – शहरातील जिल्हा परिषद शाळा व शेजारीच असलेल्या अंगणवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. परिसरात उगवलेल्या काटेरी झुडपे व गवतामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात आले होते. याबाबत दैनिक प्रभातने दि. 17 रोजी “जिल्हा परिषद शाळेला कांग्रेसचा वेढा!’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तातडीने दाखल घेऊन शाळेचा व अंगणवाडीच्या परिसराची स्वखर्चाने सहा ट्रॅक्टर मुरूम टाकून जेसीबी मशीनच्या साहाय्याने स्वच्छता केली.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात वाढलेल्या गाजरगवतामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात आले. जवळील अंगणवाडी परिसरात बऱ्याच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून, या अंगणवाडीत लहान-लहान मुले शिक्षण घेण्यासाठी येतात. पण या अंगणवाडीचा परिसर घाण असल्याने येथे डासांचे प्रमाण वाढले असून, घाणीमुळे दुर्गंधी पसरत असून परिणामी मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
याबाबत दैनिक प्रभातमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी स्वखर्चातून सहा ट्रॅक्टर मुरूम टाकून जेसीबी मशीनच्या साहाय्याने स्वच्छता कामाला सुरवात करण्यात आली.
या वेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, दैनिक प्रभातचे पत्रकार ओंकार दळवी, समीर शेख यांचा शाळेतर्फे मुख्याध्यापक संजय कर्डिले यांनी सत्कार केला. या वेळी सुलभा कुंडे, वंदना मोरे, राधा डिसले, अलका धावूड,कल्पना ससाणे, शिरीष कदम, राणी वराडे, कल्पना साबळे, कल्पना मोरे, सारिका पोले, रेखा साळे, सागर माकुडे, कालिंदा मेहेत्रे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश गंगे उपस्थित होते.