अकोले – दूधदर प्रश्नावर उद्याच्या मंत्रिमंडळात चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, तसेच अधिवेशनापूर्वी पुन्हा एकदा शेतकरी प्रतिनिधींसमवेत बैठक घेऊ, असे आश्वासन दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे यांनी डॉ. अजित नवले यांना दूरध्वनी करून दिल्याने, तसेच जनसंघर्ष संघटनेतर्फे उपोषणाला बसलेल्या संदीप दराडे व अंकुश शेटे यांना जिल्हाधिकारी सिद्धाराम साळीमठ यांनी बैठक घेतली जाईल, असे लेखी पत्र उपोषणस्थळी दिल्याने दुधाला किमान ३४ रुपये दर द्यावा, या मागणीसाठी अकोले येथे सुरु असलेले उपोषण ६व्या दिवशी स्थगित करण्यात आले आहे.
जेष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दूधप्रश्नी सरकारने लक्ष घालावे ही मागणी केली होती. तसेच डॉ. अजित नवले व इतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन केले होते. किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनीही उपोषण यशस्वी व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. सर्वांच्या सूचनांचा आदर करत उपोषण स्थगित करण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष भाव वाढल्याशिवाय संघर्ष थांबविणार नाही, असे डॉ. नवले यांनी जाहीर केले.
दुधाचे कोसळलेले दर सावरण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. सध्या फ्लश सीजन सुरू आहे. या हंगामात दूध उत्पादन वाढल्याने दुधाचे दर कोसळतात. महिना-दोन महिन्याने दुधाच्या भावाची लीन सिजनकडे वाटचाल सुरू होईल. या काळात दुधाचे उत्पादन कमी झाल्याने दुधाचे दर आपोआप वाढू लागतात. बैठका व चर्चांमध्ये वेळ वाया घालवून सरकार वेळकाढूपणा करत आहे. दुधाचे भाव आपोआप वाढण्याची वाट पाहत आहे. जेव्हा शेतकऱ्यांना गरज आहे तेव्हा मदत न करता आणखी महिनाभराने सरकार अनुदानाचा निर्णय घेणार असेल, तर तो शेतकऱ्यांना नव्हे तर दूध कंपन्यांना लाभदायक ठरणार आहे. तेव्हा अधिक वेळ वाया न घालवता सरकारने तातडीने दुधाला अनुदान जाहीर करावे व अनुदान दूध कंपन्यांना न देता सरळ शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी या वेळी डॉ. नवले यांनी केली.
सध्या दूध पावडरचा साठा वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर कोसळल्याने निर्यात बंद झाली आहे. दूध दर कोसळण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. अशा पार्श्वभूमीवर सरकारने दूध पावडर निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अशीही मागणी या वेळी करण्यात आली. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. डॉ. मोहन पवार यांनी या वेळी झालेल्या सभेचे सूत्रसंचालन केले.