अकोले/ राजूर – अगस्ती सहकारी साखर कारखाना मतभेद न करता एकजुटीने, काटकसरीने व पारदर्शकपणे चांगला चालवुन सभासदांच्या विश्वास कायम ठेवा.अगस्ती कारखान्याला आपण कायम सहकार्य करू, असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.
अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील शेतकरी समृद्धी मंडळाच्या नूतन संचालकांनी आ. डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते सीताराम गायकर, अशोकराव भांगरें अजित पवार यांची पुणे जिल्हा सहकारी बॅंकेत भेट घेतली. यावेळी प्रकाश मालुंजकर, ऍड.वसंतराव मनकर, बाळासाहेब ताजणे, युवा नेते महेश नवले, गुलाब शेवाळे, अनिल कोळपकर, नीलेश गायकर आदी उपस्थित होते.
अगस्ती कारखाना निवडणुकीत अजित पवार यांच्या आवाहनाला साथ देत अकोलेतील सभासदांनी सत्ता परिवर्तन करुन पिचडांच्या ताब्यातील कारखाना महाविकास आघाडीच्या शेतकरी समृद्धी मंडळाच्या सर्वच्या सर्व जागा निवडून देऊन एकतर्फी दिला. या निकालानंतर समृद्धी मंडळाचे सर्व संचालक अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी आ.डॉ लहामटे व ज्येष्ठ नेते गायकर यांनी निवडणुकीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला तसेच श्री गायकर यांनी कारखान्याच्या सद्य स्थिती बाबत माहिती दिली.