संगमनेर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर तालुकाप्रमुखपदी संजय फड यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नुकत्याच नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. संजय फड हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असून, यापूर्वी त्यांनी शिवसेना विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे.
त्यानंतर शहरप्रमुख, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शासन नियुक्त संचालक म्हणून त्यांनी कार्यभार पाहिला आहे. समाजातील विविध घटकांसाठी त्यांनी पक्षाच्या माध्यमातून अनेक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची दुसऱ्यांदा संगमनेर तालुकाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.
निष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद आहे. सध्या संकटाचा काळ असला, तरी पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडू व सर्वांना बरोबर घेत कुठल्याही गटातटाला थारा न देता वाटचाल करणार असल्याचे तालुकाप्रमुख संजय फड यांनी निवडीनंतर सांगितले.