शेती नुकसानीचे पंचनामे तात्काळ व्हावेत

कुलदीप कोंडे : भाताचे आगार असलेल्या वेल्ह्याला अतिवृष्टीचा फटका

वेल्हे – अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे वेल्हे तालुक्‍यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आस्मानी संकटामुळे हिरावल गेला आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर नुकसान झालेल्या पिकांचे व शेतजमिनीचे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरापाई मिळावे अशी मागणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे यांनी वेल्हे तालुक्‍याचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांच्याकडे केली.

भाताचे आगार समजले जाणाऱ्या वेल्हा तालुक्‍यात अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतजमीन वाहून जात आहेत. तयार भात पीक प्रचंड वारे व कोसळणारा पाऊस यामुळे शेतातच आडवे झाले आहे. भाताच्या लोंबीलाच नवीन कोंब फुटले आहेत. अति पावसामुळे भात पीक कुजले असून, काळपट पडले आहे, तसेच वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे भात पिकावर करपा, खोडकीडसारखे रोग पसरले आहेत.

वेल्हे तालुक्‍याच्या पश्‍चिमेकडील 18 गाव मावळ विभागात भात, नाचणी, वरई पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर नुकसान झालेल्या पिकांचे आणि शेतजमिनीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरापाई मिळवून द्यावी, अशी मागणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे यांनी वेल्हे तालुक्‍याचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांच्याकडे केली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दत्तात्रय देशमाने, शिवसेना युवा नेते अशोक रेणुसे,युवा सेनेचे आदित्य बोरगे, उपतालुकाप्रमुख सुशांत भोसले, उपविभागप्रमुख प्रभाकर रांजणे, संदीप दिघे, अनिल सणस, शिवदास खाटपे, पुष्कर वैद्य, सचिन खोपडे, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.