आग्रा – यमुना द्रुतगती महामार्गावर मंगळवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. आग्र्याहून नोएडाकडे जाणाऱ्या भरधाव कारने डिझेल कंटेनरला धडक दिली. अपघात घडल्यानंतर कारला भीषण आग लागली. आगीत पाच लोकांचा होरपळून मृत्यू झाला असून त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
कारला लागलेली आग भीषण होती, या आगीत मरण पावलेल्यांचे फक्त सांगाडे शिल्लक राहिलेले दिसत आहेत. जळालेल्या लोकांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला. स्विफ्ट डिझायर कार क्रमांक यूपी 32 केव्ही 6788 आग्रा येथून लखनऊकडे जात होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खांदौली पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात 160 किलोमीटर अंतरावर कंटेनर पुढे जात होता. कंटेनरच्या ड्रायव्हरने अचानक स्टेअरिंग फिरवलं, त्यामुळे बाजूनं भरधाव वेगात येणाऱ्या गाडीला कंटेनर धडकला. कंटेनरच्या डिझेल टॅंकलाच ही कार धडकल्यानं गाडीला प्रचंड आग लागली. गाडी चालक मोठ्यानं ओरडला. पण त्याचदरम्यान कार सेंट्रल लॉक झाल्यामुळे लॉक उघडता आले नाही.
जवळच यमुना एक्स्प्रेसचे एक बूथ असून, यातील कर्मचाऱ्याने या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. तोपर्यंत ड्रायव्हर कंटेनर सोडून पळून गेला होता. अपघाताच्या काही क्षणांतच कारनं पेट घेतला आणि त्यात अडकलेले लोक बाहेर पडू शकले नाहीत. अग्निशमन दलाने गाडीला लागलेली आग विझविण्यासाठी पाच फायर ब्रिगेडच्या गाड्या मागवल्या. जिवंत जळालेल्या लोकांमध्ये एक मूल, एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.