नगर, (प्रतिनिधी)- हिवरे बाजारबद्दल मी ऐकून होतो, या आदर्श गावाला भेट देण्याची इच्छा बरेच दिवस मनात रेंगाळत होती. तो योग आज जुळून आला. याचा मला अतिशय आनंद होत आहे. हिवरे बाजारमधील स्वच्छता आणि शुद्ध पाणी पुरवठ्याचे नियोजन व्यवस्थापन एखाद्या नगरापेक्षाही अधिक उत्कृष्ट आहे.
हिवरेबाजारमधील घरे, सार्वजनिक इमारती, रस्ते , शौचालय, कृषीविकास, सामाजिक शिस्त हे सार काही सुंदर व नाविन्यपूर्ण आहे. भर मे महिन्यात प्रखर उन्हाळ्यात एक हात मारताच. बोअरवेलमधून पिण्याचे पाणी बाहेर पडणे हा अल्प पाऊस पडूनही हा मला एक चमत्कार वाटला.
पाण्याचा प्रत्येक थेंब हिवरे बाजारकरांनी वाया न घालवता जपला म्हणून हे घडले. हिवरे बाजारमधील सुंदर काम सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. याचे श्रेय पद्मश्री पोपटराव पवारांना व गावकऱ्यांना देतो. हिवरे बाजारची भेट अविस्मरणीय आहे, असे मत आर्मी मेडिकल कोअर ग्रुपचे लेफ्टनंट कर्नल सीनम तांबी यांनी हिवरे बाजारच्या भेटीत सांगितले. पद्मश्री पोपटराव पवार यांनी संपूर्ण विकास कामांची माहिती दिली.