- शहरवासियांना दिलासा
- 959 नवीन रुग्णांची नोंद
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरवासियांनी लॉकडाऊमध्ये पाळलेल्या नियमाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. शहरात दोन महिन्यानंतर करोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजारापेक्षा कमी आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शहरात आज नवीन 959 बाधितांची नोंद झाली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस शहरातील बाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली. मार्च महिन्याच्या मध्यामध्ये शहरातील बाधितांच्या संख्येने हजाराचा आकडा ओलांडला. त्यानंतर गेले दोन महिने करोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत होती. शहरवासियांसाठी एप्रिल महिना सर्वाधिक घातक ठरला. या महिन्यामध्ये रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत गेली. तर करोनाचे सर्व रेकॉर्डस तोडत या काळात दिवसाला साडेतीन हजार रुग्ण संख्या येत होती. मात्र, तब्बल दोन महिन्यानंतर आता करोनाचा आलेख उतरू लागला आहे. दोन महिन्यानंतर रुग्णसंख्या हजाराच्या खाली आली असून, आज 959 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शनिवारी (दि. 15) शहरात 959 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील रुग्णांची आकडेवारी पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली नाही. आजपर्यंत शहरातील 2 लाख 40 हजार 820 जणांना करोनाची लागण झाली आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृतांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. आज दिवसभरात 79 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 44 व शहराबाहेरील 35 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरात 4473 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 3562 जणांचा समावेश आहे. तर शहराबाहेरील 1832 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 2105 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 17 हजार 791 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 8093 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. किती रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत याबाबत पालिकेने आकडेवारी जाहीर केली नाही. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 5648 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 13 हजार 775 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 19 हजार 423 इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयात 54 जणांची प्रकृती चिंताजनक
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 15) उपचार घेत असलेल्या 54 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुळशी, पुणे विद्यापीठ, थेरगाव, औंधगाव, दापोडी, धनकवडी, नवी सांगवी, बालेवाडी, शिवाजीनगर येथील रुग्ण करोनाबाधित आढळले आहे. जुनी सांगवी आणि सासवड येथील दोघांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये एक पुरुष आणि एक महिला रुग्णाचा समावेश आहे. थेरगाव आणि नवी सांगवी येथील दोघांना “डिस्चार्ज’ देण्यात आला आहे. त्यामध्ये एक पुरुष आणि एक महिला रुग्णाचा समावेश आहे. रुग्णालयात सध्या 69 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 54 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 1 हजार 608 जण बरे होऊन घरी परतले आहेत. 1 हजार 981 रुग्ण सध्या गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.