Corona | ग्रामीण भागात दारोदार तपासणी आणि सर्वेक्षणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली, दि. 15 – केंद्र सरकारने दिलेल्या व्हेंटिलेटर्सचा वापर काही राज्यांत केला जात नसल्याच्या वृत्ताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांच्या अध्यक्षतेखाली करोना स्थितीचा आढवा घेण्यासाठी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी या व्हेंटिलेटरचा वापर होतो की नाही याचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले.

जेथे संसर्ग दर अधिक आहे तेथे स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्याचबरोबर ग्रामीण भागात दारोदार चाचण्या आणि सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले.

जर गरज असेल तर आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केल्याचे सरकारी निवेदनात म्हटले आहे. ऑक्‍सिजन कॉन्स्ट्रेंटर पुरवून ग्रामीण भागात ऑक्‍सिजनचा पुरवठा व्यवस्थित होईल. यासाठी योजना आखण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांना गरज असल्यास अशी अत्याधुनिक उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण द्या. याशिवाय रुग्णालयांना अखंडित वीजपुरवठा मिळेल, याची काळजी घ्या. म्हणजे ही उपकरणे व्यवस्थित कार्यरत राहतील, असे पंतप्रधान म्हणाले.

जेथे संसर्ग दर अधिक आहे तेथे चाचण्यांची संख्या वाढवा. राज्यांना बाधितांच्या संख्येबाबत पारदर्शकता दाखवण्यासाठी उत्तेजन द्या. त्यामुळे करोना नियंत्रणाच्या त्यांच्या कार्यावर विपरीत परिणाम होणार नाही. ग्रामीण भागात दारोदार तपासणी आणि सर्वेक्षणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली. या साथीच्या विरोधात लढण्यासाठी आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला देशात दर सप्ताहात सुमारे 50 लाख चाचण्या केल्या जात असत त्या वाढून आता दीड कोटीच्या घरात पोहोचल्या आहेत, अशी माहिती पंतप्रधानांना या बैठकीत देण्यात आली. देशभरातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्य सरकारशी सहकार्य वाढवून लसीकरण नियमित होण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली.

देशातील संसर्ग दर कमी होत आहे. तसेच बाधित बरे होण्याचा दरही वाढत आहे हा राज्य आणि केंद्र सरकारने केलेल्या एकत्रित कामाचा परिणाम आहे, असे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.