मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षाचा निकाल जाहीर झाला आहे. कल्याण वालधुनी परिसरातील अभिषेकने या परीक्षेत यश संपादन करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. अभिषेकच्या यशामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अभिषेकचे आई-वडील दोघेही शिक्षक असल्याने त्याला घरातूनच शिक्षणाचं बाळकडू अभिषेकला मिळालं होतं. अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगत अभिषेकने जिद्दीने अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत केले. बीए मॅकेनिकलपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्याने एमपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती. मार्च 2020 मध्ये त्याने पहिली परिक्षा दिली होती. त्यात त्याला अपयश आले. तरीही त्याने परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. त्याचबरोबर त्याने एका खाजगी कंपनीत नोकरी सुरू केली. एमपीएससीची परिवहन विभागातील सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक पदासाठी परीक्षा जाहीर झाली त्याचा त्याने जोरदार अभ्यास सुरु केला. अभिषेकने दिवसातील 13 तास अभ्यास करत हे यश संपादन केले. 21 तारखेला अभिषेकचा वाढदिवस असतो. याच दिवशी त्याला गोड बातमी मिळाली आहे.
राज्यात प्रथम क्रमांक मिळेल असे वाटले नव्हते. यशाचे सर्व श्रेय आपले आई-वडिल आणि अभ्यासात मदत करणाऱ्या मित्रांचे आहे. सर्वांनी स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहित केले. कोकणातील खेड तालुक्यातील मुंबके गावातील आमच्या घराण्यातील तिसरी पिढी प्रशासकीय सेवेत दाखल होताना विशेष आनंद होत आहे. आजवर मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुजनांचे आभार, अशी प्रतिक्रिया अभिषेकने दिली आहे.