मुंबई – खासदार नवनीत राणा यांना जामीन मिळाल्यानंतर भायखळा कारागृहातून थेट लिलावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. स्पॉन्डॅलिसिसच्या त्रासामुळे लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळाल्यावर नवनीत राणा यांनी पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा साधला. तसेच राणा दाम्पत्य दिल्ली दौरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या दौऱ्यामध्ये त्या केंद्रातील नेत्यांच्या भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना बुधवारी मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, कागदपत्रांची पूर्तता न केल्याने राणा दाम्पत्याची गुरुवारी तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटल्यानंतर लगेचच नवनीत राणा यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रवी राणाही पत्नीची काळजी घेण्यासाठी तुरुंगातून थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हेही नवनीत राणा यांना भेटण्यासाठी शुक्रवारी रुग्णालयात पोहोचले होते. नवनीत राणा यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज दिला गेला. यानंतर राणा दाम्पत्य दिल्ली दौरा करणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. लढण्याचा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमच्यावर दबाव टाकून कारवाई करत आहेत. मुख्यमंत्री राज्यात दौरे करत नाहीत. तसेच मंत्रालयातसुद्धा येत नाहीत. असे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करत येत्या काही दिवसांत आम्ही दिल्लीतील नेत्यांना समस्या सांगणार असल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.