किव्ह – पूर्व युक्रेनमधील एका गावातील शाळेवर झालेल्या बॉम्बहल्ल्यामध्ये किमान 60 जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. युक्रेनच्या पूर्व भागातील लुहान्स्क प्रांतातील शाळेवर हा बॉम्बहल्ला झाल्याचे स्थानिक गव्हर्नरच्या सूत्रांनी सांगितले. बिलीहोरियस्का गावातील या शाळेवर रशियाच्या फौजांनी शनिवारी दुपारी हा बॉम्ब हल्ला केला. या शाळेमध्ये किमान 90 जणांनी आश्रय घेतलेला होता.
बॉम्बस्फोटानंतर या शाळेला आग लागली आणि शाळेची इमारत जमिनदोस्त झाली. ही आग विझवण्यास चार तास लागले, मातीचा ढिगारा उपसल्यानंतर काहीजणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, असे स्थानिक गव्हर्नरांनी टेलिग्राम ऍपवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या इमारतीतून 30 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आह. सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र उर्वरित साठ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्यांचे मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही दबलेले आहेत, असे समजते आहे. मात्र या बॉम्बहल्ल्याच्या वृत्ताला अधिकृत वृत्तसंस्थेकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.
रशियाने युद्धादरम्यान सामान्य नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप युक्रेनकडून करण्यात आला आहे. मात्र रशियाने हा आरोप फेटाळून लावला आहे. दरम्यान मारिऊपोल शहरातून शेकडो नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
या सर्वांना टप्प्याटप्याने तेथून बाहेर काढण्यात येते आहे. संयुक्त राष्ट्राने मध्यस्थी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटनेच्या मदतीने मारिऊपोलमधून बाहेर काढण्याचे काम गेल्या आठवड्यापासून सुरू करण्यात आले आहे. अझोवस्तल स्टील प्रकल्पात अडकलेल्या 300 जणांना बाहेर काढण्यात आले आहे असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी शनिवारी रात्री देशवासियांना उद्देशून केलेल्या व्हिडीओ संदेशात सांगितले,