परभणी – परभणी जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या परभणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले. तानाजी सावंत परभणीचे पालकमंत्री असताना मंजूर करण्यात आलेल्या 288 कोटींचा डीपीसीचा निधी समान वाटप करण्यात आला नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, यावरूनच आजच्या बैठकीतही जोरदार खडाजंगी झाली.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सर्वच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री संजय बनसोडे यांच्यासमोर अनुपालन अहवाल मांडण्यात आल्यानंतर या अनुपालन अहवालावरूनच खासदार संजय जाधव आणि इतर आमदारांनी विरोध करत सर्वांना समान निधी देण्याची मागणी केली.
मागच्या डीपीडीसीच्या संदर्भातही परभणीतील लोकप्रतिनिधींवर अन्याय झाल्याचं त्यांनी सांगितले. यावरून भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी तुमच्याच काळात आमच्यावर अन्याय झाला असे म्हटले. तसेच, पुन्हा तुम्ही परभणीच्या विकासाला विरोध करून निधी बाबत न्यायालयात केस केलीय असेही म्हटले.
हिंगोलीच्या नियोजन समितीच्या बैठकीतही खडाजंगी –
दरम्यान, हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या नियोजन बैठकीतही खडाजंगी झाली होती. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी हेमंत पाटील यांनी मंत्र्यांना चक्क शिवीगाळ केल्याचे वृत्त आहे. ही ऑनलाइन बैठक होती. त्यात वाद झाल्याने शेवटी बैठकीचा आवाज म्युट करावा लागल्याचीही खबर आहे.
नियोजन आयोगाच्या निधी वाटपातून हा वाद झाला. त्यात आक्षेपार्ह वाटप झाल्याचा दावा करीत खासदार पाटील हमरीतुमरीवर आले आणि त्यांनी पालकमंत्र्यांवर चांगलीच आगपाखड केली. त्यांनी त्यांना उद्देशून अपशब्दही वापरल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर त्याच्या बातम्याही प्रसारीत झाल्या. परंतु त्यावर दोघांकडूनही काही भाष्य आलेले नाही.