मुंबई – ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. खासकरून स्त्री वर्गाचे या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटात वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, दीपा परब, शिल्पा नवलकर यांनी उत्तम भूमिका साकारली आहे. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांचे मनं जिंकून घेतले आहे. या चित्रपटातील अभिनेत्री सुकन्या मोने ‘बाईपण भारी देवा’ सिनेमानंतर एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.
सुकन्या मोने स्वप्निल जोशी सोबत इंद्रधनुष्य सिनेमात अभिनय करणार आहेत. नुकतेच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. लंडनमध्ये या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. अभिनेता स्वप्नील जोशीसह सागर कारंडे, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, श्वेता पाटील, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, नेहा खान या चित्रपटात दिसणार आहेत. पांडुरंग जाधव ‘इंद्रधनुष्य’ हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.
एक पुरुष आणि सात बायकांच्या कथानकावर आधारित असलेला ‘इंद्रधनुष्य’ हा चित्रपट आहे. ‘मनातल्या उन्हात’, ‘ड्राय डे’, ‘भारत माझा देश आहे’ असे अफलातून चित्रपट पांडुरंग जाधव यांनी प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या नव्या सिनेमाला देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का? हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात छोट्या-छोट्या गोष्टी विनोदी शैलीतून दाखवण्याचे कसब वंदना गुप्ते यांच्यामध्ये दिसून येते. माईंच्या (रोहिणी हट्टंगडी) पतीची भूमिका करणारे अभिनेते सतीश जोशी स्वतःच्या सहज सुंदर अभिनयाने आपली वेगळीच छाप उमटवतात. तर सुकन्या मोने यांनी साकारलेली प्रेमळ तसेच धांदरट “साधना’ जणू काही आपल्याच कुटुंबातील एक व्यक्ती वाटते. सततच्या घर, ऑफिस, नवरा यांच्या तणावामुळे अकाली रजोनिवृत्त झालेली दीपा परब (चारू) असहायतेचे दर्शन घडवते. बाई स्वतः कमावत नसेल तर घरात तिला मिळणारी किंमत शिल्पा नवलकर उत्तम प्रकारे मांडते. या चित्रपटातून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सामान्य माणसाच्या भावविश्वाला चांगल्या प्रकारे उलगडले आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटला असून या अजूनही याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.