लंडन : भारतीय नागरिकांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारकडून मानाचा समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराने अनेकांना गौरविण्यात आलं आहे. २०२० साली भारताने ब्रिटनचे खासदार बॅरी गार्डिनर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. मात्र हे खासदारच चीनचे गुप्तहेर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ब्रिटनच्या गुप्तचर संघटनेनं धक्कादायक खुलासा केल्यानंतर भारत सरकारकडून जाहीर झालेल्या सन्मानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
ब्रिटनच्या सुरक्षा एजन्सी एमआय 5 ने दिलेल्या माहितीनुसार, बॅरी गार्डिनर यांनी एका चिनी गुप्तहेराकडून निधी मिळवून ब्रिटनमधील लोकशाही प्रक्रियेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
क्रिस्टिन चिंग कुई ली नावाची ही महिला क्रिस्टिन ली अँड कंपनी चालवते. तिने बॅरी गार्डिनरच्या कार्यालयाला निधी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. चिंग कुई ली हिची लंडन आणि बर्मिंगहॅम येथे कार्यालये आहेत. या कार्यालयांकडून लंडनमधील चीनच्या दूतावासाला कायदेशीर मदत देखील पुरवण्यात येते. लीचा मुलगा डॅनियल विल्कीस हा बॅरी गार्डनरच्या वेस्टमिन्स्टर कार्यालयात नोकरीला होता. मात्र आता त्याने राजीनामा दिला आहे.
गार्डिनर ब्रिटनच्या लेबर पार्टीचे सदस्य आहेत. गार्डिनर यांनी ब्रिटनमधील भारतीय समाजासाठी केलेलं काम आणि भारतीयांमध्ये त्यांनी मिळवलेली लोकप्रियता या आधारावरच त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर बॅरी गार्डनर यांना 2020 मध्ये भारताकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
क्रिस्टीन चिंग कुई ली ही देखील चिनी गुप्तहेर असून, ती ब्रिटनमध्ये चीनमधील सत्ताधारी पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंट (UFWD) साठी काम करते. युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंटच्या आदेशानुसार, क्रिस्टीन ब्रिटनमध्ये राजकीय हस्तक्षेप आणि अस्थिरता निर्माण करण्यासाठी काम करते.