Parth Bhalerao: बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या पार्थ भालेरावने (Parth Bhalerao) सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘बॉईज 3’ हा चित्रपट रिलीज झाला. यातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. अभिनय क्षेत्रातील दमदार कामगिरीनंतर पार्थने दिग्दर्शनातही पदार्पण केलं आहे. याद्वारे त्याने एक नवीन सुरुवात केली आहे. पार्थ एका नाटकाचे दिग्दर्शन करणार आहे.
‘हम दोनो और सूट’ हे एकपात्री नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केन थेम्बा यांच्या लघुकथेवर आधारित हे नाटक आहे. या नाटकाद्वारे अभिनेता पार्थ भालेराव दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. निरंजन पेडणेकर यांचे लेखन असणारे हे नाटक आहे. तर हे नाटक रितिका श्रोत्री (Ritika Shrotri) सादर करणार आहे. सध्या या नाटकाची प्रेक्षकांना देखील अधिक उत्सुकता लागली आहे.
या नाटकाबाबत पार्थ भालेराव म्हणाला की, “1970 च्या काळातील ‘हम दोनो और सूट’ची कथा मला प्रचंड भावली. 1 ही गोष्ट एका अशा कपलची आहे, ज्यांचे नवीनच लग्न झाले आहे, एकमेकांवर प्रेम आहे. तरी बायको नवऱ्याची फसवणूक करत आहे. आता ती असे का करते, हे नवऱ्याला कळल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते? या गोष्टीचा त्यांच्या नात्यावर काय परिणाम होतो? हे नाटकात पाहायला मिळणार आहे.”
पुढे तो म्हणाला, “नातेसंबंध आणि फसवणूक यावर भाष्य करणारे ‘हम दोनो और सूट’ हे नाटक असून यात प्रेक्षकांना ब्लॅक कॉमेडी अनुभवायला मिळणार आहे. रितिकाने आपल्या अभिनयाने या व्यक्तिरेखेत रंगत आणली आहे. याचा पहिला प्रयोग 13 जानेवारी रोजी पुण्यातील दि बॉक्स येथे 9 वाजता होणार आहे.”अशी माहितीही त्याने यावेळी दिली.
पार्थ भालेरावच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘भूतनाथ रिटर्न्स’ त्याने काम केले होते. यातील त्याच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. यासोबत त्याने किल्ला, बॉईज यासारख्या मराठी सिनेमातही काम केले आहे. सध्या त्याच्या ‘बॉईज 3’ या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.