नवी दिल्ली: आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मंगळवारी डिझेल पुन्हा महागले. सार्वजनिक इंधन कंपन्यांनी डिझेलच्या दरात लिटरमागे 25 पैशांची वाढ केली. मात्र, पेट्रोलचा दर “जैसे थे’ ठेवण्यात आला.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दररोज बदल केला जातो. मात्र, ती प्रक्रिया तब्बल 82 दिवस स्थगित ठेवण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक कंपन्यांनी किमतीत दररोज बदल करण्याची प्रक्रिया 7 जूनपासून पुन्हा सुरू केली. त्यानंतर एखाद-दुसऱ्या दिवसाचा अपवाद वगळता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सलग वाढ झाली. दरवाढीचे ते सत्र 30 जूनपासून थांबले. आता आठवडाभराच्या खंडानंतर डिझेल पुन्हा महागले आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत डिझेल दराचा आजवरचा नवा उच्चांक नोंदला गेला.
दिल्लीत डिझेलचा दर 80 रुपये 78 पैसे, तर पेट्रोलचा दर 80 रुपये 43 पैसे इतका आहे. सलग दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले आहे. दरम्यान, महिनाभरात पेट्रोल 9 रुपये 17 पैशांनी, तर डिझेल 11 रुपये 39 पैशांनी महागले आहे.
सार्वजनिक कंपन्यांकडून केली जाणारी इंधन दरवाढ संपूर्ण देशासाठी लागू आहे. मात्र, प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर विक्री कर किंवा व्हॅटच्या दराची वेगवेगळी आकारणी होते. त्यामुळे राज्याराज्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भिन्न आहेत.