काबूल :– अफगाणिस्तानमधील बदख्शान प्रांताचा तालिबानचा प्रभारी डेप्युटी गव्हर्नर मौलवी निसार अहमद अहमदी हा कार बॉम्बस्फोटात ठार झाला आहे. बदख्शान प्रांताची राजधानी फैजाबादमध्ये मंगळवारी सकाळी हा बॉम्बस्फोट झाला.
फैजाबादच्या महकामा प्लाझा येथील डेप्युटी गव्हर्नरच्या ताफ्याला कारबॉम्बने लक्ष्य केले गेले, असे तालिबानच्या नेतृत्वाखालील बदख्शानच्या माहिती आणि संस्कृती विभागाचा प्रमुख मौजुद्दीन अहमदी याने सांगितले. या घटनेत सहा जण जखमी झाले, तर अन्य एका व्यक्तीचा मृत्यू झाला, असे अहमदी याने सांगितले.
आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली कार अहमद अहमदीच्या कारसमोर आणून स्फोटाने उडवून दिली आणि त्यात नायब राज्यपाल आणि त्यांचा ड्रायव्हर ठार झाला, असे त्याने सांगितले. या स्फोटात आजूबाजूचे काही रहिवासीही जखमी झाले आहेत. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.
दफनविधीच्यावेळी आणखीन एक स्फोट
प्रभारी गव्हर्नर मौलवी निसार अहमद अहमदी याची कारबॉम्बस्फोटात हत्या करण्यात आल्यानंतर त्याच्या दफनविधीच्यावेळी आणखीन एक स्फोट झाला. त्या स्फोटामध्ये आणखीन एक जण ठार झाला आहे. ठार झालेली व्यक्ती तालिबानचा माजी पोलीस अधिकारी सैफुल्लाह समीम होता. तो उत्तरेकडील बागलान प्रांताचा माजी पोलीस प्रमुख होता, असे तालिबानी अधिकाऱ्याने सांगितले. नबावी मशिदीत हा स्फोट झाला. त्यावेळी तालिबानी अधिकारी आणि स्थानिक लोक उपस्थित होते. या स्फोटात समीमसह किमान 13 लोक ठार झाले