काबूल – अफगाणिस्तानातील लोकसंगीताचे गायक फवाद आंद्रबी यांची तालिबानने हत्या केली आहे. अफगाणमधील सीमाभागातील डोंगराळ प्रदेशात ही हत्या झाल्याचे आंद्रबी यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. तालिबानकडून संगीत, कला क्षेत्राची गळचेपी केली जाऊ लागल्याचे यामुळे स्पष्ट झाल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. शुक्रवारी काबूलपासून 100 किलोमीटर अंतरावरील बागलान प्रांतातील आंद्रबी व्हॅलीमध्येच ही हत्या झाली. या भागाच्याच नावावरून फवाद यांचे नामकरण करण्यात आले होते.
आंद्रबी व्हॅलीतील काही जिल्हे सशस्त्र गटांच्या नियंत्रणाखाली आहेत. या गटांनी तालिबानच्या राजवटीला सशस्त्र विरोध केला होता. या क्षेत्रातील बहुतेक भाग परत मिळवला असल्याचे तालिबानने म्हटले आहे. मात्र या भागातील हिंदु कुश पर्वताचा काही भाग अजूनही तालिबानच्या आधिपत्याखाली आलेला नाही.
तालिबानने काही दिवसांपूर्वी आंद्रब यांच्या घरी भेट दिली होती.आंद्रबी यांच्या घरी तालिबान्यांनी चहापाणीही केले होते, असे आंद्रबी यांचे पुत्र जवाद आंद्रबी यांनी सांगितले. मात्र शुक्रवार परिस्थिती अचानक बदलली. आंद्रबी यांना एका शेतात डोक्यात गोळी मारून ठार करण्यात आले असेही जवाद आंद्रबी म्हणाले. आंद्रबी हे एक सामान्य लोककलाकार होते. ते केवळ लोकांचे मनोरंजन करत होते. त्यांच्या हत्येला न्याय मिळायला पाहिजे, असे ते म्हणाले.