पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागातील प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, क्रिमिलेअर, उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे अपलोड करण्याची अट आहे. मात्र करोनामुळे ही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे कागदपत्रे अपलोड करण्याची अट रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.
पुणे विद्यापीठातील विविध विभागातील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली असून, त्याची शेवटची मुदत 30 जूनपर्यंत आहे. या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थी अर्ज करीत आहेत. अर्ज करताना विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, क्रिमिलेअर, वार्षिक उत्पन्नाचा दाखल्याची फोटोकॉपी अपलोड करण्याची अट आहे. त्यानुसार अर्जाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही.
सध्या करोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या दाखल्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यात विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे काढायचा असा प्रश्न आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.
दरम्यान, तूर्तास अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी जी माहिती दिलेली आहे, ते कागदपत्र ग्राह्य धरावी. तथापि, विद्यार्थ्यानी माहिती खोटी दिल्याचे निदर्शनास आल्यास प्रवेश रद्द करावा. परंतु सध्या अर्ज करताना कागदपत्रे अपलोड करण्याची अट रद्द करावी, अशी मागणी स्टुडंट हेल्पींग हॅंडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी कुलगुरूंकडे केली