पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवर राज्यात 80 हजार 910 बालकांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 2 हजार 21 एवढ्या बालकांचे अधिकचे प्रवेश झाले आहेत.
“आरटीई’ अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येत असते. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी “आरटीई’ प्रवेशाकरीात 8 हजार 823 शाळांनी नोंदणी केली असून यात 1 लाख 1 हजार 846 एवढ्या प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या. या जागांसाठी राज्यातूल3 लाख 64 हजार 413 एवढ्या बालकांचे त्यांच्याकडून ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आले होते. प्रवेशासाठी ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली होती. यात 94 हजार 700 बालकांना प्रवेश जाहीर करण्यात आले होते.
प्रतिक्षा यादीत 81 हजार 129 बालकांचा समावेश करण्यात आला होता. लॉटरीद्वारे निवड झालेल्या 64 हजार 44 बालकांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले होते. यानंतर प्रतिक्षा यादीतील बालकांना प्रवेशासाठी संधी देण्यात आली. प्रतिक्षा यादीतील पहिल्या प्रवेश फेरीद्वारे 13, 691 बालकांचे प्रवेश झाले. दुसऱ्या फेरीअंतर्गत 3 हजार 175 बालकांचे प्रवेश झाले आहेत. तर, 20 हजार 936 जागा रिक्तच राहिल्या आहेत. नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळत नसल्याने बहुसंख्य बालकांच्या पालकांनी अन्यत्र सोयीच्या ठिकाणी आपल्या बालकांचे प्रवेश निश्चित केले.
पुणे जिल्ह्यातही प्रवेशाच्या जागा रिक्तच
पुणे जिल्ह्यात “आरटीई’ प्रवेशासाठी 935 शाळांमध्ये 15 हजार 596 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. यासाठी 77 हजार 531 अर्ज दाखल झाले होते. लॉटरीद्वारे 15 हजार 501 बालकांची निवड झाली होती. यातील 10 हजार 696 बालकांचेच शाळामध्ये प्रवेश निश्चित झाले आहे. पहिल्या प्रतिक्षा यादीद्वारे 4 हजार 494 बालकांना प्रवेश जाहीर झाले असले तरी त्यातील केवळ 2 हजार 414 बालकांचेच प्रवेश झाले आहेत. प्रतिक्षा यादीतील दुसऱ्या फेरीद्वारे 1 हजार 627 बालकांना प्रवेश जाहीर झाला होता. त्यातील 657 बालकांचेच प्रवेश झाले आहेत. एकूण 13 हजार 767 बालकांचे प्रवेश झाले आहेत. मात्र अद्यापही 1 हजार 829 प्रवेशाच्या रिक्तच राहिल्या आहेत.