सातारा -जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये सोमवारपासून मुख्याधिकाऱ्यांचे प्रशासक राज सुरू झाले. मुख्याधिकाऱ्यांच्या देखरेखीअंर्तगत कार्यकारी समितीद्वारे आचारसंहिता लागू होईपर्यंत कारभार चालविला जाणार आहे.
नगर विकास विभागाच्या निर्देशाप्रमाणे पाचगणी व महाबळेश्वर वगळता जिल्ह्यातील इतर सहा नगरपालिकांच्या नगरसेवकांचा पंचवार्षिक कालावधी संपल्याने मुख्याधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
याचे आदेश सोमवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद संकलन विभागाला प्राप्त झाले. त्यामुळे सातारा, रहिमतपूर, कराड, फलटण, म्हसवड, वाई या पालिकांवर नियुक्त मुख्याधिकाऱ्यांनाच प्रशासक म्हणून कार्यभार देण्यात आला. जिल्हा प्रकल्प संचालक अभिजित बापट यांनी त्या त्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी आदेश मंगळवारी तातडीने रवाना केले.
सातारा पालिकेचा चार्ज मुख्याधिकारी बापट यांनी स्वीकारत कामकाजाला सुरवात केली. नगरपालिका अधिनियम 1965 कलम 315 ब प्रमाणे मुख्याधिकारी प्रशासक या नात्याने कार्यकारी समिती रचना करून कामकाज करण्यात येते. यामध्ये पालिकेच्या विभाग प्रमुखांचा समावेश असतो. या कार्यकारी समितीने दिलेले संकलित प्रस्ताव प्रशासकाच्या साक्षरीने मान्य होऊन त्या कामाची अंमलबजावणी केली जाते.
मार्चपर्यंत प्रशासकच?
पाचगणी व महाबळेश्वर येथील पालिकांची मुदत 31 डिसेंबर रोजी संपत आहे. तेथे 1 जानेवारीपासून प्रशासक म्हणून मुख्याधिकारी काम पाहणार आहेत. सहा पालिकांमधील राजकीय वर्दळ सध्या थंडावली आहे. ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने पालिका निवडणुका चार महिने पुढे ढकलण्याच्या विषयाला सर्वपक्षीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आचारसंहिता साधारण मार्चपर्यंत लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तोपर्यंत मुख्याधिकारीच पालिकांचा कारभार सांभाळणार आहेत .