‘आशिकी 2′ या चित्रपटानंतर बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला. आता आदित्य लवकरच एका मॉडेलशी साखरपुडा करणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. एका वृत्तपत्रानी दिलेल्या वृत्तानुसार मॉडेल दिवा धवन हिच्यासोबत आदित्य पुढच्या महिन्यात साखरपुडा करणार आहे. तर पुढच्या वर्षी हे दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचेही समजते आहे.
आदित्य व दिवाने त्यांच्या नात्याचा कधिच स्विकार केला नव्हता. ते नेहमीच प्रसारमाध्यमांसमोर आम्ही केवळ मित्र असल्याचे सांगायचे. ती खूप चांगली मुलगी आहे आणि आमच्यात खूप चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी एका फॅशन शोमध्ये आमची ओळख झाली होती. काही वेळा डिनरलासुद्धा एकत्र गेलो आणि त्यामुळेच आम्ही डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले, असे आदित्य “कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये सांगितले होते.
दिवा ही प्रसिद्ध मॉडेल असून तिने मनिष मल्होत्रा, जे.जे. वलाया, तरुण ताहिलियानी यांसारख्या प्रसिद्ध डिझायनरसाठी रॅम्प वॉक केला आहे. दिवा ही मुळची अमेरिकेची असून न्यूयॉर्कमधील काही चॅरिटी शोसाठी देखील तिने रॅम्प वॉक केला आहे. तर, आदित्य रॉय कपूरने व्हीजे म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने यानंतर लंडन ड्रीम्स, ऍक्शन रिप्ले, गुजारिश यांसारख्या चित्रपटात काम केले. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता आशिकी 2 या चित्रपटामुळे मिळाली. त्याची या चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजली होती.