भोपाळ – देशात करोना महासाथीने थैमान घातले आहे. विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. कडक निर्बंधांमुळे विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होत असली तरी यामुळे अर्थचक्र मात्र पूर्णपणे थांबले आहे. करोनामुळे गेल्या वर्षभर आर्थिक झळ सोसलेल्या नागरिकांचा धीर सुटू लागला आहे. यातूनच काही ठिकणी करोना विषाणू संसर्गाचा व प्रशासनाच्या कारवाईचा धोका पत्करून लोक आपले व्यवसाय लपूनछपून सुरु ठेवताना दिसतायेत.
अशीच एक घटना भोपाळ येथील शाजापूर येथे घडली असून त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शाजापूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजूषा विक्रांत राय शहरामध्ये कर्फ्यूचे पालन होत आहे काय? हे पाहण्यासाठी पोलिसांच्या लवाजम्यासह फिरत होत्या. तेव्हा त्यांना एक चपलांचे दुकान उघडे असल्याचे आढळले.
यानंतर पोलिसांनी सदर दुकानदारास बाहेर बोलावले. यावेळी दुकानातून एक लाहान मुलगा बाहेर आला व त्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी राय यांना, ‘हे दुकान आपल्या घराचाच हिस्सा असल्याने उघडे ठेवले आहे.’ असं सांगितलं. यावर अतिरिक्त जिल्हाधिकारी राय संतापल्या व त्यांनी, ‘जर तुझे घर मिरकला भागात आहे तर तू खोटं का बोलत आहेस?’ असं विचारत त्या लहान मुलाला थोबाडीत दिली. हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याचं समजतंय.
प्राप्त माहितीनुसार हे दुकान लहान मुलगा व त्याचे वडील चालवतात. कर्फ्यूदरम्यान दुकान उघडे ठेवल्याचा ठपका ठेवत आता स्थानिक पोलिसांनी हे दुकान सील केले आहे. मात्र आता हा व्हिडीओ पुढे आल्याने करोना व लॉक डाऊनमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या नागरिकांसोबत प्रशासनाने सक्तीने वागू नये अशी मागणी समाजमाध्यमांवर जोर धरू लागली आहे.
दरम्यान, या प्रकरणी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजूषा विक्रांत राय यांच्यातर्फे आपली बाजू मांडण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वीच छत्तीसगड येथील सुरजपूर येथे शहराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका तरुणाला कानशिलात वाजवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
यानंतर सुरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीबाबत राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल यांनी माफी मागितली होती. तसेच सदर जिल्हाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
शाजापुर अपर कलेक्टर मंजूषा विक्रांत राय का थप्पड़ मारने का वीडियो वायरल,कोराना कर्फ़्यू के दौरान जूते की दुकान में मौजूद बच्चे को मारा थप्पड़, दुकान खोलने पर बरसा एडीएम का गुस्सा @ndtv @ndtvindia pic.twitter.com/n0K4jq0bSp
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) May 24, 2021