पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाशिवरात्रीला पुणे जिल्ह्यातील निळकंठेश्वर, बनेश्वर आणि घोराडेश्वर मंदिरांत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून शहराच्या महत्त्वाच्या स्थानकातून बस सोडण्यात येणार आहेत. तरी प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले.
येत्या 8 मार्च महाशिवरात्रीला शहरासह जिल्ह्यातील भीमाशंकर, निळकंठेश्वर, बनेश्वर, घोराडेश्वर यासह अन्य श्री शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. त्यामध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर येथील भाविकांसाठी एसटी प्रशासनाकडून जादा बसचे नियोजन केले आहे, तर शहराच्या जवळपास असलेल्या निळकंठेश्वर, बनेश्वर, घोराडेश्वर याठिकाणी भाविकांना जाण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून विशेष बससेवा सुरू केली आहे.
त्यामध्ये – कात्रज सर्पोद्यान येथून बनेश्वरसाठी (चेलाडी फाट्यापर्यंत), स्वारगेट मुख्य स्थानक येथून निळकंठेश्वरसाठी, तर निगडी (पवळे चौक) येथून घोराडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) पर्यंत बससेवा असेल. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
– कात्रज सर्पोद्यान येथून बनेश्वर (चेलाडी फाटा) येथे जाण्याकरिता पहिली फेरी पहाटे ०५.३० वा. असून यात्रेसाठी २ जादा बस, तसेच पर्यायी बसमार्ग क्रमांक ६१, २९३, २९६ व २९६-अ अशा एकूण ११ बस सरासरी २० मिनिटांनी सुटतील.
– स्वारगेट मुख्य स्थानकावरून निळकंठेश्वर (रूळेगांव) येथे जाण्याकरिता पहिली फेरी पहाटे ०३.३० वा. आहे. यात्रेसाठी १२ जादा बस, तर पर्यायी बसमार्ग क्रमांक ५२-अ या मार्गावर २ नियमित बस सरासरी १५ ते २० मिनिटांनी सुटतील.
– निगडी (पवळे चौक) येथून घोराडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) येथे जाण्याकरिता पहिली फेरी पहाटे ०५.२० वाजता सुटेल. पर्यायी बसमार्ग क्रमांक ३०५, ३४१, ३४२, ३६८ व ३७१ या ०५ मार्गांवर एकूण २०
बस सरासरी १० ते १५ मिनिटांनी उपलब्ध होईल.