मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूने 12 नोव्हेंबर 2022 रोजी एका सुंदर मुलीला जन्म दिला. काही महिन्यांपूर्वी तिने तिच्या लेकीचे फोटो शेअर करत तिचे नाव ‘देवी’ ठेवल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. ती अनेकदा आपल्या लाडक्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यानंतर आता बिपाशा आणि तिचा पती करण सिंग ग्रोवरने आपल्या सहा महिन्यांच्या लेकीसाठी आलिशान कार खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
बिपाशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या नवीन कारचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पती करण सिंग ग्रोवरबरोबर Audi Q7 ची डिलिव्हरी घेताना दिसत आहे. कार घेण्यापूर्वी या जोडप्याने केक कापून आनंद साजरा केल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसते. या लक्झरी कारची किंमत सुमारे 92 लाख रुपये आहे.
हा व्हिडीओ शेअर करीत बिपाशाने लिहिले की “देवीची नवीन सवारी. दुर्गा दुर्गा.” बिपाशाच्या या व्हिडीओवर तिचे चाहते अभिनंदन करत आहेत. यावेळी बिपाशा आणि करण दोघेही आनंदी असल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बिपाशाने तिचा जीममधील एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘आई कधीही हार मानत नाही.’ आई झाल्यानंतर बिपाशा स्वत:ला फिट करण्यासाठी व्यायाम करतांना दिसली. याआधी बिपाशा शेवटची 2015 मध्ये आलेल्या ‘अलोन’ चित्रपटात दिसली होती.