कोल्हापूर – शादी डॉट कॉम या वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर एका डॉक्टर युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिने नकार दिल्याने तिच्याशी लगट करून विनयभंग केल्याप्रकरणी एका प्रसिद्ध मालिकेतील कलाकाराला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. जितेंद्र शेलाजी पोळ (वय 32, रा.कात्यायनी कॉम्प्लेक्स, कलंबा जेल, कोल्हापूर) असे अटक केलेल्या कलाकाराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जितेंद्र पोळ याची “शादी डॉट कॉम’ या वेबसाईटच्या माध्यमातून एका युवतीशी ओळख झाल्यानंतर तिच्यासमोर त्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण त्या युवतीने लग्नाला नकार दिला. असे असताना पोळ याने पीडित युवती काम करत असलेल्या ठिकाणी वेळोवेळी जाऊन चोरून पाठलाग करून तिला अडवून लगट करण्याचा प्रयत्न केला.
तसेच तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. त्यामुळे पोळ याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास राजारामपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजेंद्र कलगुटकर करत आहेत.