पुणे – कर्फ्यूच्या काळातही गल्ली बोळांमध्ये हातगाडीधारक किंवा बैठे विक्रेते विनापरवाना वस्तू आणि अन्य गोष्टींची विक्री करत असल्याचे दिसून आले आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याला महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाकडून सुरुवात केली आहे.
हातगाडीधारक, बैठे विक्रेते, भाजीपाला फळे विक्रीची छोटी दुकाने, फिरत्या हातगाड्या, रस्ता पदपथांवर सुरू केल्यामुळे रस्त्यांवर अनधिकृतपणे जमाव, गर्दी होत आहे. या गर्दीमध्ये करोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले जात नसल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. हे सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश असतानाही त्याचे उल्लंघन केले जात असल्याने यांच्यावर कारवाई करण्याला सुरुवात केली आहे.
या सर्व अनधिकृत व्यावसायिकांवर जमावबंदी आदेशांतर्गत त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आवश्यक ती कारवाई करावी, असे पत्र महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी पोलिसांच्या विशेष शाखेच्या उपायुक्तांना दिले आहे.